
मी कसा घडलो :
अंदाजे 1972 च्या सुमारास महत् प्रयासाने डॉ.कांबळे (आयुर्वेदिक) च्याकडे योगासनाची माहिती घेतली व त्यानुसार घरी योगासनाचा अभ्यास सुरू केला. योगाचे ज्ञान जमविण्याचा मला जणु छंदच लागला व तो आजपर्यंत टिकून आहे. 1973 -74 च्या आसपास सोलापुरात तेथेच वास्तव्य करीत असलेले श्री किशनचंद परमाणी यांच्यासोबत भगिनी समाज संस्था, सिद्धेश्वर पेठ व सिद्धेश्वर कापड मार्केट फलटण गल्ली (पोस्ट ऑफिसचे टेरेसवर) काही दिवस योगासनाचे वर्ग व शिबिर घेतले. 1978 व 1982 मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या इंटरनॅशनल योग कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. मी 1981 मध्ये विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथील योग शिक्षा वर्ग व 1982 मध्ये बिहार योग विद्यालय, मुंगेर येथील योगशिक्षक हा कोर्स पूर्ण केला. एकीकडे माझी योगासनाची प्रॅक्टिस सुरू होतीच. योग शिबिराच्या माध्यमातून योगासन शिकवण्याचे काम मी 1975 पासून सुरू केले. 1983 चे दरम्यान ठाणे (मुंबई) येथील निकम गुरुजी यांच्याकडे मला प्राणायाम व त्यातील शुद्धिक्रिया शिकण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. 1990 पर्यंत सोलापुरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आस्थापनात मी योगासनाचे अनेक शिबिरे घेतलेले आहेत. त्यात प्रामुख्याने वैकुंठभाई सभागृह, औद्योगिक बँक, साखर पेठ,सोलापूर व सहस्रार्जुन मंगल कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, या ठिकाणांचा समावेश होतो. त्याच दरम्यान 1986 मध्ये मला निसर्गोपचारचा डिप्लोमा करण्याची संधी प्राप्त झाली. तसेच दैनिक समाचार मध्ये योगासनावर प्रदीर्घ लेखमाला लिहिण्याची संधी मिळाली. दैनिक संचार, दैनिक तरुण भारत यामध्येही माझे योगासनावर लेख त्यावेळी प्रकाशित झाले आहे.
मी राज्य सरकारच्या विक्रीकर कार्यालयात कार्यरत असल्याने 1990 मध्ये माझी बदली पुणे येथे झाली. मी पिंपरी चिंचेवड या भागात राहत होतो, 1990 चे 2009 पर्यंत पुणे, पिंपरी- चिंचवड या भागात अनेक ठिकाणी योगासनाची शिबिरे घेतलेलीआहेत. श्रीकृष्ण मंदिर, मुंबई-पुणे रस्ता, निगडी, पिंपरी येथील, अजमेरा हौसिंग कॉम्प्लेक्स, मासूळकर काॅलनी, कामगार नगर, चिंचवडगाव, मोहन नगर, केशवनगर, विक्रीकर कार्यालय, सातारा, जेजुरी, जि.पुणे, सांगोला (जिल्हा सोलापूर) व विक्री कर कार्यालय, माझगाव, मुंबई येथील विक्री कर कार्यालयात योगासनाचे प्रात्यक्षिक व योग शिबिरे झालेली आहेत. 1990 पासून आज पर्यंत श्री बी के एस अयंगार यांच्या संस्थेत योगासन शिकण्याची संधी मला मिळाली व शेवटपर्यंत योगाचे विद्यार्थीच राहावे भावनेने योगाचे विस्तृत ज्ञान आज पर्यंत अवगत करीत आलो आहे.
पुन्हा 2009 मध्ये माझी बदली सोलापुरात झाली. 2010 पासून 2015 पर्यंत पाच वर्षे मनोरमा हॉल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर येथे मी सकाळी योगासनाचे वर्ग घेतले आहेत. या कालावधीत माझ्या योग वर्गात सोलापुरातील अनेक नामवंत डॉक्टर्स, प्राध्यापक, वकील, अधिकारी व उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील अनेकांनी भाग घेऊन योगासन प्राणायाम यांचे धडे घेतलेले आहेत. मी 2013 मध्ये शासकीय सेवेतुन निवृत्त झालो असून 2016 पासून पुन्हा चिंचवड भागात रहात असुन चिंचवड भागात योगासनेचा प्रचार व प्रसार करीत आहेय. चुंबक चिकित्सा या विषयावरील माझी पुस्तिका प्रकाशित झाले आहे.
माझ्या योगासन यात्रेत व जडण घडणामध्ये माझ्या वडिलांची मला फार मदत झाली आहे. सध्या ते नाहीत. तसेच माझ्या कुटुंबातील सर्वांचे मला सहकार्य लाभले. सोलापुरात योग शिबिरे घेत असताना, पूर्व भागातील कै.धर्मण्णा सादुल (माजी खासदार) यांनी मला वैकुंठभाई सभागृहात योगासन शिबिरे घेते वेळेस वेळोवेळी सभागृह उपलब्ध करून दिले. सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात योगासन शिबिरे घेताना, त्यावेळीचे ट्रस्टींनी मला सहकार्य करून जागा उपलब्ध करून दिली. 2011 चे 2015 या कालावधीत सोलापुरात योग वर्ग घेताना श्री चंद्रकांत पटवर्धन साहेब, सी. ए. श्री राजेश पटवर्धन व त्यांचे कुटुंबीयांनी योगासन साठी प्रशस्त असा हॉल उपलब्ध करून दिला व "आपल्या मनोरमा हॉलमध्ये योग वर्ग चांगला चालावा" या उदात्त हेतूने अनेकांना योग वर्गात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे हा वर्गही पाच वर्षे छान प्रकारे सुरू होता. माझ्या आयुष्यातील ५ वर्षाचा कालावधी हा गोल्डन येरा-सोनेरी काळच होय. मी विक्रीकर कार्यालयात प्रदीर्घ अशी 36 वर्षे सेवा केली. पुणे सोलापुरातील सर्व अधिकारी वर्गाने, कर्मचाऱ्यांनी मला सहानभूतीपूर्वक मदत केल्यामुळेच, मला सोलापूर व पुणे कार्यालयात अनेक योगासन शिबिरे घेता आली. यामध्ये प्रमुख्याने कै. तडवी साहेब (अपर विक्रीकर आयुक्त) श्री अशोक व्हटकर साहेब (जॉईट विक्रीकर उपायुक्त) व श्री के. आर. खाडे साहेब (विक्रीकर उपायुक्त) यांचा प्रमुख्याने उल्लेख करीत आहे. सोलापुरातील माझ्या योग कार्याचे साक्षीदार असलेले माझे मित्र श्री नागनाथ चौगुले (वि.अ.) यांनीही वेळोवेळी मला सतत प्रोत्साहन दिल्यामुळे हे कार्य करता आले. पुणे येथे योग प्रचाराचे काम करीत असताना माझे मित्र कै.बाळासाहेब डेंगळे यांनीही मला सतत प्रोत्साहन देऊन वेळोवेळी मदत केल्यामुळे त्यांचाही मी ऋणी आहे. सध्याच्या डिजिटल जमान्यात लॅपटॉप, कॉम्प्युटर व मोबाईल यातील सर्व ज्ञान देऊन मला डिजिटल साक्षर करण्याचे काम माझी कन्या कु.गीता ही करीत आहे. मी योगाचे प्रात्यक्षिक करीत असताना योगाचे सुंदर फोटो व उत्तम व्हिडिओ बनविण्याचे काम, ती मनापासून करते. त्यामुळे मला इतर कोणाची मन धरणी करावी लागत नाही. अशाप्रकारे माझी योगवारी सुरू आहे. शेवटी पुणे येथे आल्यापासून म्हणजे 1990 पासून आज पावेतो मी बी. के. एस्. अय्यंगार संस्थेत योगासन शिकण्यासाठी जात असतो. कै.अय्यंगार गुरुजी व कै.गीताताई व प्रशांत सर, अभिजाता व सध्याचे तेथील अनेक योगशिक्षकांचा प्रभाव माझ्यावर पडला आहे व त्यांचे बहुमुल्य मार्गदर्शन होत आहे. या संस्थेतून मला पुष्कळ व पुष्कळ शिकता आले. अय्यंगार संस्थेची योगासन शिकवण्याची अति उत्कृष्ट अशी वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. याचा अनुभव घेतल्याशिवाय पटणार नाही. या संस्थेचाही माझ्या जडणघडणामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे माझे प्रांजळ मत आहे. जोपर्यंत हात पाय हलत राहतील तो पर्यंत योगसेवा करण्याची मनिषा आहे.
जवळजवळ पन्नास वर्षाच्या माझ्या योगमय जीवनात व योग कार्यात हस्ते पर हस्ते अनेक लहान मोठ्या व्यक्तींचे सहकार्य मला लाभलेले आहे. जागे अभावी त्यांचा नाम उल्लेख करणे कठीण जात आहे, अशा सर्वांचा मी ऋणी आहे.
